पिंपरी : तरुणीचे बनावट आधारकार्ड तयार करून तिचे दोन तरुणांशी लग्न लावून देत फसवणूक केली. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी (दि. ४) हा प्रकार घडला.
राहुल दशरत कनसे (३७, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, मूळ रा. भांडवली, ता. माण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ज्योति रविंद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंढे, भावेश रवींद्र पाटील, ज्योती पाटीलचे आई-वडील आणि त्यांची मुलगी निशा दत्ताराम लोखंडे (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम ३१८ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगणमत करून मुलगी निशा लाखंडे हिचे चैतन्य खांडे यांच्यासोबत लग्न लावून देऊन चैतन्य यांच्याकडून पैसे घेतले. तसेच निशा हिचे बनावट आधारकार्ड तयार करून त्याच्या आधारे फिर्यादी राहुल कनसे यांना तिचे नाव निशा दत्ताराम पाटील असे नाव असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी राहुल यांचा भाऊ सुनील कनसे यांच्यासोबत निशा हिचे लग्न लावून दिले. त्यासाठी फिर्यादी राहुल यांच्याकडून एक लाख ५५ हजार रोख तर ९५ हजार भावेश रवींद्र पाटील याच्या खात्यावर स्वीकारले. यात संशयितांनी संगणमत करून तोतयेगिरी करून ठकवणूक केली. तसेच २ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.