लोणी काळभोर गावचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी असते. या यात्रे निमित्त नऊ दिवस अगोदर मंदिरात घटस्थापना करण्यात येते. घटस्थापना, अखंड हरिनाम सप्ताह, नैवेद्य, पालखी, कुस्त्यांचा आखाडा, तमाशा, हळदी समारंभ, देवाचे लग्न, छबिना आदी धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. यंदा मात्र गतवर्षी प्रमाणेच कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गावची यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीमंत अंबरनाथ देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाची पूर्वकल्पना ग्रामस्थांना अगोदरच देण्यात आली होती. त्यामुळे घटस्थापना असूनही आज मंदिरात कुणीही गर्दी केली नव्हती.
श्रीमंत अंबरनाथाचे पुजारी गणपत भैरवकर यांनी आज पहाटे श्रींना महामस्तकाभिषेक केला. त्या नंतर श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीची चौपाळ्यावर विराजमान बैठ्या रुपामध्ये पुजा बांधली. सायंकाळी सहा वाजता प्रथेनुसार घटस्थापना करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भक्तांच्या अनुपस्थितीत सर्व धार्मिक विधी पुजारी गणपत भैरवकर यांनी केले.
चैत्र नवरात्रा निमित्त ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीची चौपाळ्यावर विराजमान बैठ्या रुपातील पुजा बांधण्यात आली होती.