लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’, पदरावरच्या जरतारीच्या नक्षीदार मोराने मोहीत झालेल्या कन्येने आपल्या आईकडे पैठणी नेसण्याचा हट्ट धरल्याचे लडीवाळ चित्र उभे करणाऱ्या या गीताने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. या अविट गोडीच्या गीताप्रमाणे पारंपरिक शालू व पैठणीचा रूबाब अद्यापही लग्नसोहळ्यात कायम आहे. बदलत्या युगात कितीही नवनवीन व्हरायटी बाजारात येत असल्या तरी जुने पारंपरिक दागिने, कपडे यालाच महिला पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असल्याने जोरात लग्नसराई सुरू आहे. लग्न म्हटले की कपडे खरेदी आलीच़ मात्र महिला इतर कपडे घेण्यापेक्षा पैठणीलाच जास्त महत्त्व देताना दिसून येत आहेत. म्हणतात ना जुनं ते सोनं या म्हणीनुसार पारंपरिक पद्धतीलाच या मॉडर्न युगात महत्त्व येत आहे. सध्या बाजारात किमती शालू व पैठणी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. हौसेला मोल नाही़ ही म्हण काही खोटी नाही़ अगदी ४ हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत शालू व पैठणी बाजारात आहेत; मात्र किमतीकडे पाठफिरावीत महिला शालू व पैठणी खरेदी करीत आहेत. लग्न म्हटले की, वधूसाठी पैठणी हवीच, असा हट्ट आजही अनेक जण धरतात. महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा पारंपरिक उत्कृष्ट नमुना म्हणजे पैठणी होय. पैठणी गर्भरेशमी असून तिचा पदर संपूर्ण जरीचा असतो. काठ रूंद व ठसठसीत वेलबुटीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूने सारखीच वेलबुटी दिसणे, हे तिचे खास वैशिष्ट्य मानले जाते. विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार व इतर मंगल कार्यात गृहलक्ष्मीचा साज हीच पैठणीची पारंपरिक ओळख आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यात पैठणी अपेक्षित असते. पैठणीच्या विणेत व वाराणसीच्या शालूत बरेच साम्य आहे. या दोन्ही पद्धतीत विणकर रेशमी पोताखाली हव्या असलेल्या नक्षी कामाचे कागद ठेवून त्यानुसार काम करीत. सध्या तर वधू बरोबरच अनेक हौसी महिला पैठणीला पसंती देत आहेत़ लग्न समारंभ म्हटला की त्यासाठी खास पैठणी हवीच आशी काहीशा महिलांचा समज झाला आहे. बाजारात विविध प्रकारच्या कलाकुसर केलेल्या साड्या आहेत, पण महिलांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते.ग्रामीण, शहरी नववधू पैठणीकडे आकर्षित गेली हजार वर्षे पैठण हे कलेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पैठण या नावावरूनच या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. पैठणच्या सातवाहन राजाचा या कलेला राजाश्रय असल्याने त्या काळात या कलेला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते़ जाणकार सांगतात, जुनी पैठणी १६ हात लांब व ४ हात रुंद असून, तिच्या पदरावर वेलबुटी व पशुपक्ष्यांचे चित्र असत. त्याकाळी रेशमी पैठणीच्या निर्मितीत सोने व चांदीचा मनसोक्त वापर होत असे. खास करून महागड्या पैठणीत त्याकाळी पदरावर चांदी, सोन्याच्या धाग्याने विणकाम करीत विविध प्रकारच्या कलेचे रेखाटन केले जात आसे. ही कला कालांतराने लोप पावत आहे. सध्या रेश्मी धाग्यानेच पैठणीवर किंवा शालूच्या पदरावर विणकाम केले जात आहे. तरी याची मागणी कमी झाली नाही. विविध प्रकारच्या व रंगीबेरंगी शालू, पैठणी नववधूंचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नववधू याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लग्नसराईत शालू, पैठणीलाच महिलांची पसंती
By admin | Published: May 07, 2017 2:54 AM