पुणे : हलाखीच्या परिस्थितीमुळे आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह तरुणाशी लावून दिला. मुलगी अल्पवयीन असताना पती, सासू, सासऱ्यांनी दुर्लक्ष केले. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती, तसेच सासू-सासऱ्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस शिपाई वैशाली सोपान पुंडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा भागातील १५ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह आई-वडिलांनी एका तरुणाशी लावून दिला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पतीसह सासू-सासऱ्यांना होती.
विवाहानंतर काही महिन्यांनी मुलगी गर्भवती झाली. मुलगी गर्भवती झाल्यानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी आली. आई-वडिलांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिची तपासणी केली. तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार अल्पवयीन मुलीचे आई-वडील, पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी करत आहेत.