- लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : शारीरिक संबंध ठेवण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय विवाहितेस दमदाटी करून तिचा विनयभंग केला. तिच्या आईला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून काटी (ता. इंदापूर) येथील दोघा जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.दशरथ बोराटे, दीपक बोराटे (दोघे रा. काटी) अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. १९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या वडापुरी येथील राहत्या घरात ही घटना घडली.ठाणे अंमलदार राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले, की अन्यायग्रस्त विवाहिता आपल्या दोन मुलांसह वडापुरी येथे आईकडे राहते. गेल्या शुक्रवारी ती स्वयंपाकघरात काम करीत होती. तिची आई घराच्या मागे साफसफाई करीत होती. आरोपी घरी आले व थेट स्वयंपाकघरात गेले. आरोपींपैकी दशरथ बोराटे याने तिचा विनयभंग केला. त्यास प्रतिकार करताना आरडाओरडा झाल्यानंतर घराच्या पाठीमागे असणारी तिची आई तेथे आली. तिला दीपक बोराटे याने धक्काबुक्की केली. दरम्यान, घैनीनाथ दगडू भोसले यांनी आरोपींपासून दोघींची सुटका केली. आरोपी एक बॅग, एक मोबाईल व दुचाकीची चावी तेथेच टाकून पळून गेले.- ही घटना घडताना आरोपींनी केलेल्या झटापटीत व नंतर घराच्या आवारातील उंच भिंतीवरून फिर्यादीचा मुलगा पडून जखमी झाला. त्याच्या दवाखान्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.