लोणी काळभोर : माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी होणारा छळ आणि पतीचे विवाहबाह्य संबंध आदी गोष्टींना कंटाळून उरुळी कांचन येथील एका विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार १७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे, नणंद, चुलत सासू-सासरे यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शीतल विपुल नेवसे (वय २८) हिने आत्महत्या केली आहे. तर पती विपुल नेवसे, सासू पुष्पा नेवसे, सासरा विलास नेवसे, चुलत सासरे कैलास नेवसे, चुलत सासू जयश्री कैलास नेवसे (सर्व रा. उरुळी देवाची), नणंद योगिता रासकर (रा. भेकराईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शीतल हिचे विपुल नेवसे याच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगाही आहे. लग्नानंतर काही दिवसांतच विपुल दारू पिऊन शीतलला मारहाण करत होता. माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. विपुलचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्यावरूनही त्यांच्यात वाद झाला.
चुलत सासऱ्यांनीही शीतलचा हात धरून तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार शीतलने तिच्या वडिलांकडे केली होती. अखेर सासरच्या छळाला कंटाळून शीतलने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतलचे वडील रोहिदास तुळशीराम सायकर यांनी पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.