पुणे : सासरी होणाऱ्या कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कात्रज येथील सावंत कॉर्नरमधील बी विंगमध्ये सोमवारी पहाटे घडला. पल्लवी वसंत नाईक (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील राजेंद्र रामचंद्र ढोणे (वय ५५, रा. चिंचवड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती वसंत अरुण नाईक (वय ४१) आणि सासू नर्मदा नाईक (वय ६५, रा. सावंत कॉर्नर, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी व वसंत नाईक यांचा जानेवारी २०१० मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर घरगुती कारणावरुन तसेच तिच्यावर संशय घेऊन पती वसंत व सासू तिचा मानसिक व शारीरीक छळ करीत होते. सासरी होणाऱ्या या छळाबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले नव्हते. छळ असह्य झाल्यावर तिने सोमवारी पहाटे इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत आहेत.