पुणे : विवाहित असतानाही बाहेर प्रेमप्रकरण करत घरात पत्नीला आय टी इंजिनिअर असलेला पती भांडणे करुन त्रास देत असे. विवाहिता गर्भवती असताना दुसरे मुल नको, म्हणून तिचा मानसिक छळ करत असे. या छळाला कंटाळून विवाहितेने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. विमानतळ पोलिसांनी अशा बाहेरख्याली पतीला अटक केली आहे.
विकास दामू शेळके (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) असे या पतीचे नाव आहे. सारीका विकास शेळके (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना पठारे वस्तीत रविवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी घडली.याप्रकरणी तिचे वडिल शामराव रामचंद्र पाटील (वय ५५, रा. आळतुर, ता. शाहुवाडी, जि़ कोल्हापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारीका आणि विकास यांचा ७ वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक ४ वर्षाची मुलगी आहे. विकास याचे बाहेर संबंध असल्याने तो सारीकाशी सतत भांडणे उकरुन काढत असे. या त्रासाला कंटाळून सारीका हिने सुसाईट नोट लिहून पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना सारीकाच्या अंगावरील कपड्यांमध्ये सुसाईट नोट मिळाली. त्यात तिने 'तुला बाहेर लफडी करायची असेल तर कर, तुला पोटातील बाळही नको होते,’ असे लिहिले आहे. विमानतळ पोलिसांनी विकास शेळके याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.