बारामती: सतत भांडणे करुन मानसिक त्रास दिल्याने सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बारामती शहरात घडला आहे.याप्रकरणी विवाहितेच्या पती,जाऊ ,सासू या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मयत सई हिची आई वंदना संजय बोंद्रे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. सई उन्मेघ गायकवाड (वय २६ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील रुई भागात बुधवारी (दि. २४ ) घडला.
पती उन्मेघ किशोर गायकवाड, सासू शोभा किशोर गायकवाड व जाऊ तनुजा तृणाल गायकवाड (रा. दुर्वांकुर अपार्टमेंट, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. उन्मेघ व सई यांचा विवाह ८ जून २०१४ रोजी झाला होता. सई सासरी नांदत असताना पतीकडून तिला सतत भांडणे काढून मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार मारहाण केली जात होती. दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा बारामती व फलटणमधील तक्रार निवारण केंद्रात सईने तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार दोन्ही बाजूंना समजावून सांगण्यात आल्यावर ती पुन्हा नांदण्यास आली होती. दरम्यान पतीने तिला दारु पिवून मारहाण, चारित्र्यावर संशय घेणे सुरुच ठेवले.
हे दोघे रुई येथे भाडोत्री घरामध्ये राहू लागले. तरीही पतीकडून होणारा त्रास सुरुच राहिला. माहेरी फोन करू न देणे, फोन वापरू न देणे असे प्रकार केले जावू लागले. सईने ही बाब आपल्या आईला वेळोवेळी कळवली. बुधवारी ( दि. २४ ) रोजी उन्मेघ याने फियार्दीला फोन करत तुमच्या मुलीला नांदवायचे नाही, तिला तुम्ही घेवून जा, मी माझा मुलगा देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर सई हिने आईला मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे, माझे सगळे संपले असे म्हणून फोन कट केला. दुपारी दोनच्या सुमारास उन्मेघ याने फिर्यादीला फोन करून सांगितले की, तुमची मुलगी दरवाजा उघडत नाही. मी मुलाला घेवून दुर्वांकूर सोसायटीत चाललो आहे. त्यानंतर फिर्यादीने मुलीशी संपर्क साधला.परंतु तिने फोन घेतला नाही. दुपारी अडीचच्या सुमारास उन्मेघ याने सई हिने गळफास घेतल्याचे फिर्यादीला कळवले. त्यानंतर माहेरकडील मंडळींनी बारामतीत रुई रुग्णालयात धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.-------------------------