शारीरिक मानसिक जाचाला कंटाळून संपवली जीवनयात्रा
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहित मुलीने शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटने नंतर अखेर मुलीच्या वडिलांनी हुंडयासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह, सासू-सासरे व दोन नणंद अशा पाच जणांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली आहे. तर पती अभिषेक वसंत तावरे याला पोलिसांनीअटक केली असून नणंद, सासू-सासऱ्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत मयत गीतांजलीचे वडील फिर्यादी सुनील लालासाहेब यादव (वय ४८) व्यवसाय शेती रा. गुरसाळे (ता. माळशिरस जि. सोलापूर ) यांनी सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता.हवेली जि.पुणे ), वर्षा वाबळे (रा. पुणे ),शारदा वसंत तावरे (रा. सांगवी, ता.बारामती जि.पुणे),अभिषेक वसंत तावरे (रा.सांगवी,ता. बारामती जि.पुणे), वसंत केशवराव तावरे (रा.सांगवी,ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लग्न थाटामाटात केले नाही अवघे सात तोळे सोने देऊ इज्जत घालवली असे म्हणत सासूसह सर्वांनी मानसिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. तसेच आरोपी पती अभिषेकने मयत पत्नी गीतांजलीला तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का साड्या घ्यायची, हलक्या साड्या दिल्यात लग्नात असे म्हणून तिच्या अंगावर साड्या फेकून दिल्या. तसेच लग्नात कमीत कमी ४० ते ५० तोळे सोनं द्यायला पाहिजे होते. आमच्या भावकीत नाक नाही ठेवलं दाखवायला असे अपमानास्पद उद्गार काढले. हुंडा म्हणून १२ तोळे सोने,एक लाख रुपये व संसारोपयोगी साहित्य घेऊन देखील ५० तोळे सोने घेऊन ये म्हणून आरोपींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येस भाग पाडले. असे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे अधिक तपास करत आहेत.