पुणे : शहरातील बेकायदा शस्त्र तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांनुसार मोहीम हाती घेण्यात आली असून, दरोडा प्रतिबंधक पथकाने तिघांना जेरबंद केले आहे. यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांचा समावेश असून, पोलिसांनी एक गावठी पिस्तूल जप्त केल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. तालीब सय्यद ऊर्फ लाला (वय ४८, रा. भवानी पेठ), राहुल खेत्रे (वय ३८, रा. राजेवाडी, नाना पेठ) आणि तेजस जावळे (रा. राजेवाडी, नाना पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे शैलेश जगताप यांना खबऱ्याने आरोपी तेजस जावळे याच्याकडे पिस्तूल असून तो चतु:शृंगी चौकातील पुलाखाली येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश जगताप, संतोष पागार, परवेज जमादार, दत्तात्रय काटम, राहुल घाडगे यांच्या पथकाने सापळा लावला. जावळे याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता कंबरेला खोचलेले एक पिस्तूल मॅगझिनसह आढळून आले. जावळे याने हे पिस्तूल तालीब सय्यद आणि राहुल खेत्रे या दोघांकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न होताच त्या दोघांनाही अटक करण्यात आली. या तिघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सराईत गुन्हेगार जेरबंद
By admin | Published: October 11, 2016 2:18 AM