पुणे : शरद मोहोळ टोळीचे काम करीत नाही तसेच पूर्वीच्या भांडणामधून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघा जणांना बारा तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून बेकायदा पिस्तूल जप्त करण्यात आले असून, हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४०, रा. गणेशनगर, एरंडवणा, कोथरूड), सचिन ऊर्फ बाळू विठ्ठल सोनवणे (वय ३०, रा. गोळे आळी, पिरंगुट, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी निखिल अंकुश गिरी (वय २६, रा. गणेशनगर, ओटा वसाहत, कोथरूड) याच्यावर गोळीबार केला होता. बाबूलाल आणि निखिल हे दोघेही पूर्वीचे एकमेकांचे मित्र आहेत. कुख्यात शरद मोहोळ टोळीसाठी ते काम करतात. आरोपी बाबूलाल आणि निखिल यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. त्या वेळी आरोपीने त्याला धडा शिकवण्याची धमकी दिली होती. मोहोळ याच्या सांगण्यावरून सोनवणेने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निखिलवर गोळीबार केला होता. ही गोळी त्याच्या पोटामध्ये घुसून आरपार गेली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरुन पसार झालेले आरोपी पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे मित्राकडे लपून बसल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, प्रकाश लोखंडे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, मोहन येलपले, संभाजी भोईटे, शशिकांत शिंदे, रवींद्र कदम, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, तुषार खडके, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना जेरबंद केले.(प्रतिनिधी)
सराइतावर गोळीबार करणारे जेरबंद
By admin | Published: April 01, 2017 2:38 AM