पुणे - रविवार पेठेतील पायल गोल्ड या सराफा दुकानावर दरोडा टाकून तब्बल 24 लाख रुपयाचा ऐवज लुबाडणाऱ्या चौघांना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने रात्री गुजरात मधील वापी येथे जाऊन पकडले. मनीष स्वार, मनोज बुगडी, प्रकाश खडका, देवेंद्र बहादूर अशी या चौघांची नावे आहेत.
या चौघानी काल दुपारी साडेतीनच्या सुमारास रविवार पेठेतील पायल गोल्ड या होलसेल सराफी दुकानात शिरून दुकानातील मनोज जैन यांना कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील 700 ग्राम सोने, 30 हजार रुपये व 2 मोबाईल लुटून नेले होते. यावेळी या दुकानाच्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले होते.
त्या आधारे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख व त्याच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील त्याचा राहण्याचा पत्ता शोधला पण ते घरी सापडले नाहीत. ते गुजरातकडे पळाले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रात्रीच्या रात्री त्यांचा छडा लावून चोरट्यांना पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जैन यांचे भागीदारीत नंदन टेरेस या इमारतीच्या तळमजल्यावर पायल गोल्ड हे सराफी दुकान आहे. या दुकानाच्या शेजारील इमारतीत त्यांचे दागिने घडविण्याची रिफायनरी आहे. पायल गोल्ड हे छोटेसे दुकान असून त्यात होलसेल व्यापार चालतो.
मुंबईहून सोने आणून सराफ दुकानदार, सुवर्णकार यांना ते विकतात. बुधवारी दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास मनोज जैन हे दुकानात एकटेच होते. त्यावेळी साधारण २५ ते ३० वयाच्या चौघा जणांनी चालत चालत येऊन इमारतीत प्रवेश केला. त्यांनी दुकानात प्रवेश करून त्यांच्यातील एकाने आपल्या कमरेला लावलेले दोन कोयते काढले. त्यातील एक दुस-याकडे दिला. त्यावेळी बाहेरून एकाने शटर ओढून घेतले. एक जण कोयता उगारून जैन यांच्यासमोर उभा राहिला.
दुस-याने काऊंटरच्या कडेने आत येऊन डॉव्हरमधील सोन्याची बिस्किटे व रोकड बाहेर काढली़ तिस-याकडे असलेल्या बॅगेत ही ऐवज भरला आणि ते काही मिनिटातच पुन्हा शटर उघडून निघून गेले. घाईघाईत जाताना त्यांनी रुमाल व कोयते तेथेच टाकून पळ काढला. बाहेर ते पळत पळत आले. त्यांच्या पाठोपाठ मनोज जैन हे आले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने कोयता फेकून मारला व तो त्यांनी तो चुकविला. आले तसे गल्लीतून बाहेर पडून दोन दिशांना ते दोघे पळून गेले.