पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११३ वा वर्धापनदिन दि. २७ मे रोजी साजरा होत आहे. या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे उपस्थित होते.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कायार्तून वाढविणा-या व्यक्तीस 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप माजगावकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय गेली चाळीस वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत नोहा मस्सील यांची डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सातासमुद्रापार असणा-या मराठी कुटुंबात मराठी भाषा आणि संस्कृती टिकून राहावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ------------------------------------------------------------------------------मावळ शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. यावर्षी मसापची मावळ शाखा (जिल्हा पुणे) या करंडकाची मानकरी ठरली आहे. राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) यांना देण्यात येणार आहे. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रावसाहेब पवार (मसाप शाखा सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे) आणि नरेंद्र फिरोदिया (सावेडी उपनगर शाखा अहमदनगर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
'' मसाप जीवनगौरव '' दिलीप माजगावकर यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 6:15 PM
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कायार्तून वाढविणा-या व्यक्तीस 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाते.
ठळक मुद्देलेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप माजगावकर सन्मानितमावळ शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११३ वा वर्धापनदिन