पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचन संस्कृती समृद्ध करणारी छोट्या छोट्या गावातील तसेच शहरातीलही ग्रंथालये जलमय झाली. हजारो पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. ही ग्रंथालये पुन्हा पुस्तकांनी फुलून जाण्यासाठी आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'पूरग्रस्त भागातली ही ग्रंथालये पुन्हा ग्रंथांनी भरून जावीत यासाठी साहित्य परिषदेतर्फे ग्रंथ दिले जाणार आहेतच. तसेच पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथवितरक आणि साहित्यप्रेमींना करीत आहोत. हे ग्रंथ त्या वाचनालयापर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.
अशी देता येईल पुस्तकसाथ * साहित्यिक, साहित्यप्रेमी, प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी आपल्या इच्छेनुसार पुस्तके रविवार आणि सुटीचा दिवस सोडून सकाळी ९.३० ते १२ आणि दुपारी ४. ३० ते ८ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात सेवकांकडे द्यावीत. आपण देत असलेल्या पुस्तकांची यादी स्वत: तयार करून आणावी आणि साहित्य परिषदेकडून पोच घ्यावी.* टपालाद्वारे ग्रंथ पाठविणा-यांनी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे - ४११०३०. या पत्त्यावर पाठवावीत. पाकिटावर 'पूरग्रस्त ग्रंथालयासाठी' असा उल्लेख करावा.* जीर्ण, खराब झालेली पुस्तके किंवा पाठयपुस्तके पाठवू नयेत.* जुनी मासिके आणि दिवाळी अंकांचा स्वीकार केला जाणार नाही.* इच्छुकांना पुस्तक मदतीसाठी दि. २१ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.* त्यानंतर हे ग्रंथ संबंधित ग्रंथालयांकडे साहित्य परिषदेतर्फे सुपूर्द करण्यात येतील.