पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. रोज एक आरोप करत त्यांनी कंपनीच्या कामकाजावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्याबरोबरच आता त्यांनी कंपनीतील नियुक्त्या, कामकाज यावरही बोट ठेवण्यास सुरुवात केली आहे.मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, कंपनीच्या कार्यालयात अधिक्षक, वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक, फोटोग्राफर, सिव्हिल इंजिनिअर अशा जागांची जाहिरात देऊन आॅक्टोबर २०१७ मध्ये ११ महिन्यांसाठी रीतसर भरती करण्यात आली. आॅक्टोबर २०१८ मध्ये या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा महिनाभर कामावर घेण्यात आले. आता आॅक्टोबरच्या शेवटच्या दिवशी त्यांना एका खासगी कंपनीमार्फत अर्ज करण्यास सांगितला आहे. या कंपनीमार्फत अर्ज केल्यावर पूर्वीप्रमाणे कामावर येण्यासही सांगितले आहे. ही मध्यस्थ कंपनी कुठून आली, असा प्रश्न मनसेने विचारला आहे. त्या कंपनीचे कर्मचारी घेण्यापूर्वी निविदा जाहीर करण्यात आली होती. त्यांचे वेतन कोणी ठरवले, त्यांनाच कामावर घ्यायचे, असा निर्णय कसा घेतला, त्याचे निकष काय, या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
स्मार्ट सिटीवर मनसेचे टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 2:57 AM