पुणे : साहित्य संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आता साहित्यवर्तुळाला वेध लागले आहेत ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे. संमेलनाइतकीच ही निवडणूकदेखील रंगतदार ठरणार आहे. संमेलनाच्या धामधुमीनंतर पॅनेलच्या मोर्चेबांधणीला चांगलाच वेग येऊ लागला आहे. यंदा परिषदेच्या ३३ जागांसाठी तब्बल ११७ अर्जांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आणि परिषदेच्या कार्याध्यक्षा म्हणून दोन्ही संस्थांवर हुकूमत ठेवलेल्या पहिल्या महिला पदाधिकारी डॉ. माधवी वैद्य यांनी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३० मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे १५ मार्च रोजी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. यासाठी आता पँनेलच्या स्थापनेसाठी इच्छुकांशी बोलणी सुरू झाली आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये बोगस मतपत्रिका, त्यांची झालेली पळवापळवी या माध्यमातून विद्यमान पदाधिका-यांवर झालेले आरोप आणि धर्मादाय आयुक्तांकडे परिषदेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. वि.भा देशपांडे यांनी घेतलेली धाव या गोष्टींमुळे साहित्यविश्व ढवळून निघाले होते. किमान तीन पॅनेल निवडणुकीत उतरणार, असे बोलले जात आहे. लेखक प्रा. मिलिंद जोशी, विद्यनाम पदाधिकारी सुनील महाजन, यांच्यासह जुन्या पदाधिकाऱ्यांच्या एका पॅनेलचा समावेश आहे. या पॅनेलमध्ये संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई (पुणे), विजय कोलते (सासवड), भारत देसडला (घुमान) यांचा समावेश आहे. साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचाही एका पॅनेलमध्ये समावेश आहे. मात्र ते कोणत्या पॅनेलमध्ये असतील हे स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)
मसाप निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
By admin | Published: January 21, 2016 12:56 AM