यवत : केडगाव (ता. दौंड) येथे बारावी बोर्डाचे परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी करण्यास विद्यार्थ्यांना मदत केल्याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर मोठी काळजी घेतली जात आहे. अशातच केडगाव येथे सामूहिक कॉपी प्रकरणात परीक्षण केंद्रप्रमुख यांच्यासह नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालय असणाऱ्या परीक्षा केंद्रात भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाचे प्रमुख व विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.
सोमवार (दि.२७) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील जवाहर विद्यालयातील बारावीची परीक्षा केंद्र क्रमांक १९३ येथे अचानक भेट दिली. तेव्हा परीक्षा काॅपीमुक्त न करता, विद्यार्थ्यांना सामूहिक काॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता, त्यांना काॅपी करण्यासाठी उत्तेजन देऊन अप्रत्यक्ष सहाय्य केले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन १९८२ ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली.
आरोपी परीक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उपकेंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, शिक्षक प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोडनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करीत आहेत.
कॉपी पकडल्यास पुढच्या पेपरवर प्रतिबंध
बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परीक्षेदरम्यान केंद्रांवर भरारी पथकाद्वारे पाहणी केली जात आहे. विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जात आहे. एकदा कारवाई केल्यावर विद्यार्थ्यांना पुढचे कुठलेही पेपर देता येत नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा वापर करू नये असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.