पुणे : ‘सामाजिक संघटनांकडून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे समाजपरिवर्तन होत आहे. सरकारपेक्षा लोकसहभागातून अधिक परिणामकारक परिवर्तन घडू शकते. केंद्राने जलसंधारण कामांमध्ये या संघटनांना स्थान दिल्यास सरकार आणि समाज एकत्र येऊन परिवर्तनाची गती अधिक वाढेल,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते.
‘नाम’सह अन्य संघटनांनी केलेल्या कामांमुळे दुसरी इयत्ताही न शिकलेला शेतकरी पाण्याचे इंजिनिअरिंग समजू लागला. जलसंधारणाची कामे पाहून त्या अहवालावर केंद्र सरकारने देशभरासाठी शासन निर्णय जारी केले, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राजकारणाचा स्तर घसरला : नाना पाटेकर
‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकारणावर कडक ताशेरे ओढत राजकारणाचा स्तर घसरल्याची खंत व्यक्त केली.
सत्ताधारी व विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे असून, त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंशत: लागू करण्यात आल्या आहेत. त्या पूर्णपणे लागू कराव्यात, अशी मागणी नाना पाटेकर यांनी केली. कर्जमाफी किंवा पैशांची गरज नसून शिफारशी पूर्ण लागू झाल्यावर शेतकऱ्यांचा मोठा सन्मान होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.