दौंड : मसनेरवाडी येथे एका घरावर सशस्त्र दरोडा टाकून मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या संदर्भात महादेव लोणकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रात्री आम्ही सर्व जण जेवण करून झोपलो. पहाटे मला बाहेरगावी जायचे असल्याने मी रात्री साडेतीन वाजता उठलो. आवरून बाहेरगावी जाण्यासाठी निघताना घराचा दरवाजा उघडला, तेव्हा घराच्या दरवाजाबाहेर तीन चोरटे उभे होते. त्यातील दोघे घरात घुसले मी त्यांना प्रतिकार केला. मात्र, घरात घुसून त्यांनी माझा मुलगा सागर लोणकर याला सपाट बाजूचा कोयता मारला, तर माझी पत्नी रंजना लोणकर हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी पेटीतील सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम ११ हजार रुपये, एक मोबाईल घेऊन पोबारा केला. मी आरडाओरड करीत होतो. माझ्याशेजारी माझा पुतण्या राहतो, त्याच्याही घराला बाहेरून कडी लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)...अन् दरोड्याचा गुन्हा दाखल झालामंगळवारी घटना घडल्यानंतर महादेव लोणकर यांनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, पोलीस सकाळी घटनास्थळी आले. लोणकर यांनी पोलिसांना सांगितले, की सहा चोरट्यांनी आमच्या घरात गोंधळ घातला; मात्र पोलिसांनी फिर्यादीत तीनच चोरट्यांची नावे नमूद केली आणि घरफोडीचा गुन्हा दाखल केला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य फिर्यादीच्या पुतण्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर दौंड पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करावा लागला. बुधवारी घटनास्थळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिकारी तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी राम जाधव यांनी पाहणी केली.
मसनेरवाडीत दरोडा
By admin | Published: March 29, 2017 11:46 PM