वानवडी : हडपसर औद्योगिक क्षेत्रातील शिंदेवस्तीमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या कचरा विलगीकरण केंद्राला मंगळवारी दुपारी मोठ्या प्रमाणात आग लागली. कोणतीही जीवीतहानी झाली नसून आगीचे कारण समजू शकले नाही.
महापालिकेच्या वतीने खाजगीतत्वावर चालवण्यासाठी देण्यात आलेल्या कचरा विलगीकरण केंद्रात कचऱ्यातील नारळाच्या झाडाच्या फांदी, नारळाचे सुकलेले कवच, लाकडी फांदी पासून यंत्राच्या साह्याने बारीक भुसार तसेच काथ्या करण्याचे काम करण्यात येते. याचा उपयोग बायलर व इतर कामासाठी इंधन म्हणून करण्यात येतो.
या प्रकल्पात तयार झालेल्या भुसाराला मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत यंत्रसामग्री जळून खाक झाली. आग मोठी असल्याने स्थानिक नागरिकांनी अग्नीशमन दलास पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हडपसर व कोंढवा अग्नीशमन दलातील चार गाड्या याठिकाणी आल्या नंतर आग आटोक्यात आणली. प्रकल्पात वाळलेले लाकूड, लाकडाचा भुस्सा मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीचा भडका उडाला व पसरत गेली. प्रकल्पाशेजारी नागरी वस्ती, म्हशीचे गोठे आहेत, अग्नीशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्नीशमन दलाचे हडपसर केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे व स्टाफने आग नियंत्रणात आणली.