लक्ष्मण मोरे ल्ल पुणेगेल्या दोन दशकांतील वाढलेल्या संघटित गुन्हेगारीचा पाश पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती आवळला गेला आहे. बांधकाम व्यावसायिक, राजकारणी आणि गुंडांच्या अभद्र युतीमुळे शहरातील खून, खंडणीसत्र, अपहरण, जमिनींचे बेकायदा ताबे, वर्चस्वातून हल्ले-प्रतिहल्ले, शहराच्या रस्त्यांवर कोणत्याही धाकाशिवाय सुरूच आहेत. मोकाट सुटलेल्या या गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगारांचा पोलीस आयुक्तालय स्तरावर ‘डाटा बेस’ तयार करण्यात येत असून, येत्या वर्षभरात ४०पेक्षा अधिक गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या चाळीस वर्षांत गुन्हेगारीचे दर दहा वर्षांनी स्वरूप बदलत गेलेले आहे. सध्या पुणे आणि लगतच्या भागातील जमिनींना आलेल्या सोन्याच्या भावामुळे शहरातील गुन्हेगारी फोफावत चालली आहे. सराईत गुन्हेगारांचे पीक सध्या जोमात आहे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षांपासूनच मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीने पडणारे खून ही समाजासमोरील एक मोठी समस्या आहे. क्षणिक राग आणि पूर्ववैमनस्यासोबतच जमिनींचे व्यवहार, बेकायदा व्यवसायांमधील स्पर्धा हीसुद्धा वाढत्या गुन्हेगारीचे एक कारण ठरत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांनी मोक्का आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यावर भर दिला आहे. सध्या पुण्यातील मोठमोठ्या टोळ्या शांत असल्या तरी पडद्याआडून त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. कुख्यात गजा मारणे, नीलेश घायवळ टोळीचे बहुतांश गुंड कारागृहात आहेत. पुण्यामध्ये संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाल्यानंतर माळवदकर, आंदेकर या टोळ्यांमध्ये पेटलेला संघर्ष पुणेकरांनी पाहिलेला आहे. या दोन टोळ्यांच्या वादामधून खुनांचे एक सत्रच सुरूझाले होते. त्यानंतर गजा मारणे, बाबा बोडके, गणेश मारणे या टोळ्यांमध्ये संघर्ष पेटला. बोडके टोळीच्या संदीप मोहोळ ऊर्फ पैलवान याचा गणेश मारणे टोळीने खून केल्यानंतर पुन्हा टोळीयुद्ध भडकले होते. मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ पेटून उठला होता. त्यातूनच त्याचीही नवीन टोळी निर्माण झाली. जमिनींच्या व्यवहारांमध्ये आणि बेकायदा ताबे घेण्याची कामे या टोळ्या करू लागल्या. यामधून मिळालेली लाखो रुपयांची माया वापरून टोळ्या पोसल्या जाऊ लागल्या. गुन्हेगारांच्या अंगावर किलोभर सोने, महागड्या आलिशान गाड्या बघून नवीन युवक त्यांच्याकडे खेचले जात आहेत. या तरुणांकडून खून, खंडणी आणि अपहरणासारखे गुन्हे करवून घेतले जात आहेत. गुन्हेगारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. मारणे, घायवळ टोळीमधून झालेले अलीकडच्या काळातील पप्पू गावडे आणि अमोल बधे खून तसेच प्रकाश चव्हाण, परशूराम जाधवचा खून पुन्हा चर्चेचा विषय ठरले.पोलीस आयुक्तालयाच्या उत्तर विभागाच्या हद्दीतील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकूण १३ गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांपैकी अन्वर नव्वा टोळी, बाळू वाघिरे, राकेश भरणे, प्रकाश चव्हाण या टोळ्या अधिक सक्रिय असून, मोईन कुरेशी, सचिन ऊर्फ गोट्या धावडे, बाबा भोसले, फिरोज बंगाली, मेघनाथ शेट्टी, हसन शेख, शेखर वानखेडे, जालिंदर कल्याणी या टोळ्या सध्यातरी निष्क्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर दक्षिण विभागामध्ये सर्वाधिक टोळ्या कार्यरत आहेत. त्यामध्ये कुख्यात गजा मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, शरद मोहोळ, गणेश मारणे, बापू नायर, उमेश चव्हाण या टोळ्या कार्यरत आहेत. तुंगतकर, मारटकर, राजू कानडी, मेघनाथ ऊर्फ बुधल्या शेट्टी, आंदेकर, माळवदकर, अनिल हेगडे आदी टोळ्या सध्या निष्क्रिय गणल्या जातात. ४गोळीपेक्षा कायद्यानेच गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची भूमिका घेत पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील मारामारी, गंभीर जखमी करणे, खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींची जंत्री करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगाराचे नाव, त्याच्यावरील दाखल गुन्हे, न्यायालयात प्रलंबित गुन्हे याची एकत्रित आणि अद्ययावत माहिती आता गुन्हे शाखेकडे एकत्रित केली जात आहे. यातील सर्वाधिक घातक गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीएची कारवाई करण्यात येणार आहे. ४या टोळ्यांव्यतिरिक्त शहरामध्ये कमी वयातच खतरनाक गुंड उदयाला येत आहेत. त्यांच्यावर नेहमी काहीना काही कारवाई होत असते. परंतु पोलीस या गुंडांना चाप लावण्यात मात्र अपयशी ठरत आहेत. दरम्यानच्या काळात शहरातील कायदा-सुव्यस्थेची स्थिती गंभीर बनली होती. नवनियुक्त पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी, गुन्हेगारी हा आपल्या आवडीचा विषय असून, गुन्हेगारीला पायाबंद घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येतील, असे वारंवार सांगितले आहे. ४गेल्या तीन आठवड्यांत पोलीस आयुक्त पाठक आणि सह आयुक्त सुनील रामानंद यांनी एमपीडीएच्या दोन केस केल्या आहेत. तसेच शरद मोहोळ टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई केली आहे. त्याच्यावर आणखी एक मोक्का लावण्यात येणार आहे. ४त्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आली असून, पोलिसांच्या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. येत्या वर्षभरात चाळीसपेक्षा अधिक गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘मास्टर प्लान’
By admin | Published: May 31, 2015 1:04 AM