लक्ष्मण मोरे, पुणेगेल्या दोन दशकांतील वाढलेल्या संघटित गुन्हेगारीचा पाश पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती आवळला गेला आहे. बांधकाम व्यावसायिक, राजकारणी आणि गुंडांच्या अभद्र युतीमुळे शहरातील खून, खंडणीसत्र, अपहरण, जमिनींचे बेकायदा ताबे, वर्चस्वातून हल्ले-प्रतिहल्ले, शहराच्या रस्त्यांवर कोणत्याही धाकाशिवाय सुरूच आहेत. गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगारांचा पोलीस आयुक्तालय स्तरावर ‘डाटा बेस’ तयार करण्यात येत असून, येत्या वर्षभरात ४०पेक्षा अधिक गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या चाळीस वर्षांत गुन्हेगारीचे दर दहा वर्षांनी स्वरूप बदलत गेलेले आहे. कुख्यात गजा मारणे, नीलेश घायवळ टोळीचे बहुतांश गुंड कारागृहात आहेत. पुण्यामध्ये संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाल्यानंतर माळवदकर, आंदेकर या टोळ्यांमध्ये पेटलेला संघर्ष पुणेकरांनी पाहिलेला आहे. या दोन टोळ्यांच्या वादामधून खुनांचे एक सत्रच सुरूझाले होते. त्यानंतर गजा मारणे, बाबा बोडके, गणेश मारणे या टोळ्यांमध्ये संघर्ष पेटला. बोडके टोळीच्या संदीप मोहोळ ऊर्फ पैलवान याचा गणेश मारणे टोळीने खून केल्यानंतर पुन्हा टोळीयुद्ध भडकले होते. मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ पेटून उठला होता. त्यातूनच त्याचीही नवीन टोळी निर्माण झाली. जमिनींच्या व्यवहारांमध्ये आणि बेकायदा ताबे घेण्याची कामे या टोळ्या करू लागल्या. यामधून मिळालेली लाखो रुपयांची माया वापरून टोळ्या पोसल्या जाऊ लागल्या. गुन्हेगारांच्या अंगावर किलोभर सोने, महागड्या आलिशान गाड्या बघून नवीन युवक त्यांच्याकडे खेचले जात आहेत. या तरुणांकडून खून, खंडणी आणि अपहरणासारखे गुन्हे करवून घेतले जात आहेत. गुन्हेगारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. मारणे, घायवळ टोळीमधून झालेले अलीकडच्या काळातील पप्पू गावडे आणि अमोल बधे खून तसेच प्रकाश चव्हाण, परशूराम जाधवचा खून पुन्हा चर्चेचा विषय ठरले.अन्वर नव्वा टोळी, बाळू वाघिरे, राकेश भरणे, प्रकाश चव्हाण या टोळ्या अधिक सक्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड, पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’
By admin | Published: June 01, 2015 5:29 AM