पुणे : जगात प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच सेरेब्रल पाल्सी या आजाराचे निदान झाले. दोन्ही पायाने चालता येईना. पण खचून न जाता आई-वडिलांनी व्यायाम म्हणून त्याला पोहण्यास शिकविले. यानेच त्याला उभारी दिली अन् चार ‘स्ट्रोक’मध्ये राष्ट्रीय पातळीवर त्याने सुवर्णपदक पटकावले. तर आता इयत्ता बारावीच्या निकालातही त्याने ८२ टक्के गुणांचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारला आहे. तुषार नलावडे असे या दिव्यांग (पॅरा) जलतरुणपटूचे नाव आहे.पिंपरीतील कासारवाडी येथे तुषार आई-वडिलांसह राहतो. त्याच्यासाठी आई स्मिता यांनी नोकरी सोडली. तर वडील अभिजित हे खासगी कंपनीत उच्च पदावर आहेत. अनंत अडचणींचा सामना करत शिक्षण घेणाऱ्या तुषारला शिक्षणात चांगलीच गती आहे. इयत्ता दहावी तो ८७ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला होता. तर बारावीमध्ये विज्ञान शाखेत गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेऊन ८२.०९ टक्के गुण मिळविले. त्याला आयआयटीमध्ये संगणकशास्त्र शाखेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याने नुकतीच जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षाही दिली आहे. तुषारचा जन्म झाल्यानंतर ११ व्या महिन्यातच त्याला सेरेब्रल पाल्सी हा आजार झाल्याचे निष्पण्ण झाले. दोन्ही हातात काठी घेतल्याशिवाय त्याला चालता येत नाही. त्यामुळे त्याच्या हालचालींवर खुप मर्यादा येतात. पण त्यावर मात करत तो दररोज महाविद्यालयात जात होता. त्याने जलतरणामध्येही प्राविण्य मिळविले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने ‘पॅरा गेम्स’मध्ये चमक दाखविली आहे. ब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय स्ट्रोक या चार स्ट्रोकमध्ये त्याला राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळाले आहे, असे तुषारच्या आईने सांगितले.------------
परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 6:55 PM
आव्हानांनाही अपार जिद्दीतून खणखणीत चपराक मारणारा अवलिया..
ठळक मुद्देब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय स्ट्रोक या स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक