पुणे : मातंग समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात शनिवारी काढण्यात आलेल्या मातंग संघर्ष महामोर्चात हजारोंच्या संख्येने मातंग बांधव सहभागी झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा आयोजित या मोर्चाची सुरुवात सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून झाली.मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अनुसूचित जातीकरिता असलेल्या एकत्रित आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे लोकसंख्येनुसार वर्गवारी करण्यात यावी, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रस्तावित शिथिलता रद्द करून, कडक अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांकरिता या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. शेवटच्या सत्रात महिला व युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना प्रतीकात्मक स्वरूपाने निवेदन सादर केले. विद्यार्थिनी व युवतींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. मोर्चात सर्वात पुढे महिला व युवती, ज्येष्ठ नागरिक, युवक, संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शेवटी विविध संघटनांच्या नेत्यांचा सहभाग होता.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश बागवे, सुनील कांबळे, वर्षा साठे, स्वाती लोखंडे, सोनाली लांडगे, सरस्वती शेडगे, भीमराव साठे, प्रकाश वैराळ, सचिन बागडे सहभागी झाले आहेत. अंकिता दोडके, ईशा अडगळे, लीना लोंढे, पौर्णिमा लोखंडे, मेघना कसबे, हर्षदा अडगळे, संजना जाधव, हर्षदा मोहिते या मुलींनी भाषणे केली.
अत्याचाराच्या विरोधात ‘मातंग संघर्ष’ महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:53 AM