पुणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ४ जागांचा सामना बरोबरीत निकाली झाला. महाविकास आघाडीला २ जागा, तर महायुतीला २ जागा मिळाल्या. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, तर आघाडीच्याच डॉ. अमोल कोल्हे यांनी घसघशीत मतांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केले. पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली, तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी हॅट्ट्रिक केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. उमेदवार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या नणंद-भावजयी प्रतिस्पर्धी असल्या तरी खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यामध्येच होती. तिथे सुप्रिया सुळे यांनी बाजी मारून ८३ वर्षांच्या वडिलांना विजयाची भेट दिली. त्यांचा हा लोकसभेचा सलग चौथा विजय आहे. त्यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळविला.
कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब
दुसरीकडे शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना निर्विवादपणे पराभूत केले. आढळराव यांनी शिवसेनेच्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली, मात्र हा मतदारसंघ जागावाटपात अजित पवार यांच्याकडे गेल्याचे पाहताच ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गटात प्रवेश केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेतली होती.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ व कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली. ती चुरशीची होईल असा अंदाज होता, मात्र मोहोळ यांनी आरामात बाजी मारली. धंगेकर यांना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघासह कुठेही मताधिक्य मिळाले नाही.
‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’, बारामती शरद पवारांचीच; सुळेंना सर्वाधिक ४८ हजारांचे मताधिक्य
मावळातील लढतही फार रंगली नाही. तिथे महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी अगदी सहज विजय मिळवला व हॅट्ट्रिक केली. त्यांच्या विरोधात असलेले महायुतीचे संजोर वाघेरे कमी पडले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी महायुतीच्या वतीने जाहीर सभाही घेतली होती. बारणे चांगली लढत देतील असे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.