सोमेश्वरनगर - राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत.या वर्षी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी सुरू होण्यासाठी राज्य सरकारने १ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० च्या आसपास दर होत. त्यामुळे राज्य बँक साखरेचे ही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर तब्बल पाचशे रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटल मागे ४०० रुपयांनी कमी केले.राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे ही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २६३५ रुपये उचल देत आहे.यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १८८५ रुपये उरत आहेत. तर दुसरीकडे, या वर्षीचा एफआरपी २६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना द्यायची रक्कम व उपादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने आता ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार, या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत. त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र, यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करून एफआरपी भागवावी लागली आहे.केंद्र सरकारने पोत्यामागे ५०० रुपये अनुदान दिले तर साखर निर्यातीसाठी साखर कारखाने पुढे येतील, असे मत कारखानदारांनी व्यक्त केले आहे. तर, बाहेरची साखर थांबविण्यासाठी आयात शुल्क ७५ टक्क्यांवर करण्यासाठी आज दिल्लीत बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. पुढील हंगामात तर साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याने साखर कारखाने १ आॅक्टोबरला सुरू करावेत, अशी मागणी कारखानदार करत आहेत.साखरेचे दर१३ नोव्हेंबर - ३५००१६ नोव्हेंबर - ३४८०२३ नोव्हेंबर - ३४१०७ डिसेंबर - ३२६०२१ डिसेंबर - ३१००५ जानेवारी - ३०७०४पाचशे रुपयांनी साखर खाली आल्याने साखर कारखाने चिंताग्रस्त झाले आहे. एफआरपी कशी भागावणार या मन:स्थितीत सापडले आहेत. साखरेच्या मांडलेल्या निविदांना व्यापारी वगार्तून मागणी होत नाही. त्यामुळे अनेक कारखाने ३ हजाराने साखरेची विक्री करत आहेत. तर दुसरीकडे, ३२०० रुपयांच्या आत साखर विकायची नाही अशी साखर संघाने सक्त ताकीद दिली असताना ही अजून साखरेचे दर अजून पडतील. या भीतीने साखर कारखाने ३ हजारांनी साखर विकत आहेत. तसेच सध्या साखर निर्यात बंद असून भारतात ३ हजार साखरेला दर असून निर्यातीला २४०० रुपये दर आहे.
एफआरपीसाठी जुळवाजुळव, बँकेनेही साखरेचे मूल्यांकन केले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:30 AM