संगीत मैैफलींमध्ये रसिकांची वाहवा मिळतेच; परंतु पद्मातार्इंसमोर बसून केलेले गायन आणि त्यांच्याकडून मिळणारी शाबासकीची थाप, ही माझ्यासाठी सर्वात जास्त रंगणारी मैैफल आहे. संगीताचे धडे गिरवताना गुरु-शिष्याचा शिकण्याचा, शिकवण्याचा, एकत्रितपणे काहीतरी शोधण्याचा सुरेख प्रवास सुरू असतो. या प्रवासात दोघांना एकाच वेळी एखादी गोष्ट एकत्रितपणे गवसण्याचा आनंद केवळ अवर्णनीय असतो. घराणी महत्त्वाची आहेतच. मात्र, गायक म्हणून मला काय गवसतेय, उमजतेय हे जास्त महत्त्वाचे असते, असे मत गायिका यशस्वी सरपोतदार यांनी व्यक्त केले.संगीत नाटक अकादमीचा प्रथितयश ‘युवा पुरस्कार’ मिळाल्याने आनंद तर होतोच आहे; मात्र यानिमित्ताने लहानपणापासून पद्मातार्इंसमोर बसून केलेल्या गाण्याच्या तालमी, त्यांचा ओरडा अथवा शाबासकी, गुरुंची प्रत्येक टप्प्यावर मिळत गेलेली शिकवण असे अनेक प्रसंग डोळ््यांसमोरून तरळत आहेत. गुरुंनी माझ्यावर घेतलेल्या कष्टांचे हे चीज आहे, असेच मला वाटते. संगीत मैैफलींमध्ये रसिकांसमोर सादरीकरण करताना वाहवा मिळते. मात्र, गुरुंकडून मिळणारी शाबासकीची थाप त्याहूनही मला जास्त महत्त्वाची वाटते. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गुरु-शिष्य परंपरा खूप समृद्ध आहे. सांगीतिक शिक्षण सुरू झाल्यावर गुरुला जे दिसते, ते शिष्याला दाखवण्याचा प्रयत्न गुरू करत असतो. शिष्याला ती नजर देण्यामध्ये गुरुची भूमिका महत्त्वाची असते. पद्मातार्इंना जाहीर झालेला मुख्य पुरस्कार तर मला मिळालेला युवा पुरस्कार म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. संगीताचे धडे गिरवताना गुरु-शिष्याचा शिकण्याचा, शिकवण्याचा, एकत्रितपणे काही तरी शोधण्याचा सुरेख प्रवास सुरू असतो. या प्रवासात दोघांना एकाच वेळी एखादी गोष्ट एकत्रितपणे गवसण्याचा आनंद केवळ अवर्णनीय असतो. नेमकी हीच अनुभूती या पुरस्काराने मिळाली आहे.गुरुसमोर सुरुवातीला तालमीसाठी बसताना आपली पाटी पूर्णत: कोरी असते. ज्याप्रमाणे जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणे संगीतामध्ये सूर, ताल आणि लय या महत्त्वाच्या गरजा असतात. त्यानंतर घराण्याचा प्रवास सुरू होतो. घराणी हा व्यक्तिगत नव्हे, तर त्या काळाचा, समूहाचा प्रवास असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा जन्मत:च स्वत:चा स्वभावधर्म असतो, त्याचप्रमाणे घराण्यांचाही स्वभावधर्म असतो. गायकीचा पायाभूत अभ्यास करण्याच्या दृष्टीने घराण्यांचा अभ्यास करायलाच हवा. मात्र, त्याहीपुढे जाऊन गायक म्हणून मला काय गवसतेय, उमजतेय हे जास्त महत्त्वाचे असते. घराणी गायनाची शिस्त शिकवतात. परंतु, ते गायन नसून गायनाचा एक भाग आहे. शास्त्रीय संगीत हे मनोरंजन नव्हे, तर साधना आहे. अंतर्मुख आणि आत्ममग्न करणारा तो मार्ग आहे. बऱ्याचदा, गायनासाठी मोठा वाद्यवृंद सोबत असतो. मला एखाद्या वाद्याच्या साथीने गायला जास्त आवडते. तानपुऱ्यावर ‘सा’ लागल्यानंतर होणारा आनंद जास्त असतो. आजकाल शास्त्रीय संगीतामध्ये फ्यूजनचाही समावेश होऊ लागला आहे. चांगली गोष्ट घडत असेल तर त्याचे स्वागतच केले जाते. मात्र, फ्यूजनमध्ये शास्त्रीय संगीताचा गाभा, परिणामकारकता जपली गेली पाहिजे. फ्यूजन गातानाही त्याला शास्त्रीय संगीताचा पक्का पाया असल्यास ते गायन अधिक खुलते आणि गायकही! आजकाल संगीतामध्ये वैविध्य पाहायला मिळत आहे. उडत्या चालीचे गाणे की आत्मिक समाधान, शांतता देणारे गाणे हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते. शांतताप्रिय व्यक्तींना शास्त्रीय संगीत जास्त भावते. संगीताच्या आवडीमध्ये मानसिकता जास्त महत्त्वाची असते. कोणत्या पद्धतीचे गाणे आवडावे, हे मानसिकतेवर अवलंबून असते. सध्याच्या जमान्यात संयम कमी होत चालला आहे, असे वाटते. शांतता कंटाळवाणी वाटू लागली आहे. मुलांमध्ये चंचलता वाढली आहे. याच वयात मुलांवर संगीताचे संस्कार करणे आवश्यक असते. मन:शांती आणि स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रीय संगीताला पर्याय नाही. मानसिकता बदलली, की शास्त्रीय संगीताचे महत्त्वही कळेल. मला भविष्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये गाण्याची इच्छा आहे.
पद्मातार्इंसह रंगणारी मैैफल अवर्णनीय!
By admin | Published: June 01, 2017 1:24 AM