पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वीस भाषांतील साहित्य, कथा, कादंबऱ्या, वैचारिक, आत्मकथनपर पुस्तकांचे दोनशेहून अधिक स्टॉल आहेत. या स्टॉलमध्ये एक स्टॉल तुरुंगा शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंच्या साहित्याचाही आहे.
या स्टॉलच्या दर्शनी भागावरच १५ भाषांमध्ये ६०० हून अधिक प्रकारचे साहित्य, पूज्य संत आसारामजी बापूंच्या अमृतवाणीचे संकलन, सत्संग साहित्य अमृत अशा आशयाचे फलक लावलेले आहेत. ‘महिलाओं के उत्थान हेतू’ अशा आशयाची पुस्तकेही स्टॉलमध्ये आहेत. यासोबतच विद्यार्थी व तरुणांचा विकास, आरोग्य, तणावापासून मुक्तता असेही साहित्य आहे. दोन कर्मचारी या स्टॉलवर आलेल्यांना माहिती देत असतात. यावेळी काही जणांनी आसाराम बापूतुरुंगामधून सुटला का? अशी विचारणा या कर्मचाऱ्यांना केली.
आसाराम बापूच्या मध्य प्रदेशाच्या छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही शिक्षा सध्या तो भोगत आहे. अशा व्यक्तीचा साहित्याचा स्टॉल राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात असावा, याबद्दल काही ग्रंथप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.