पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. रमाबाई यांनी केलेला त्याग, त्यांनी बाबासाहेबांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळेच मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी येथे केले.पुणे महापालिकेच्या वतीने वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाबाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होते.राष्ट्रपती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले ‘थॉट्स आॅन पाकिस्तान’ हे पुस्तक रमाबाई यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतून बाबासाहेबांची रमाबाई यांच्या वरील प्रेमाची अनुभूती येते. बाबासाहेबांना जगात नाव मिळवून देण्यात रमाबाई यांचा निर्णायक वाटा आहे. रमाबाई यांच्या प्रेरणेतूनच डॉ. बाबासाहेबांनी देशात हिंदू कोड बिल मांडून महिलांना संपत्तीत समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला.
मातोश्री रमार्इंचे जीवन प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:11 AM