पुणे : तरुणीला प्रेमात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लग्न करणार असल्याचे सांगून तिला शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरीत बोलावले. तिच्याकडील कागदपत्रे घेऊन वराचे त्याच्या साथीदारांबरोबर पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बलात्कार, फसवणूक, अपहार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस सुरेश शेलार (वय ३३, रा. रासाई बंगला, एरंडवणे), अमित यशवंतराव पापळ (वय ३५), अभिषेक यशवंतराव पापळ (वय ३३, दोघेही रा. पुणे) आणि त्यांच्या एका ३५ वर्षाच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोव्यातील एका २८ वर्षाच्या तरूणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस शेलार याने फिर्यादीला तू मला आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे वेळोवेळी बोलून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी त्याने दिली. जानेवारी २०२१ मध्ये नाशिक येथील हॉटेलमध्ये थांबलेले असताना आरेापीने त्याच्या ओळखीच्या आरोपीची पोलिस असल्याची ओळख करून तरूणीचा मोबाईल फोन, मतदार कार्ड, अशा वस्तू फसवणूक करून काढून घेतले. त्यानंतर तरूणीला १३ फेब्रुवारी रोजी आपण पुण्यातील मामलेदार कचेरी येथे लग्नाचे रजिस्ट्रेशन करू असे सांगून दोघेही पुण्यात आले. या दरम्यान तरूणी वॉशरूमला गेली असताना तेजस तिला सोडून निघून गेला. तरूणीने विश्वासाने दिलेली कागदपत्रेही तो त्याच्यासोबत घेऊन गेला असून त्याने ती कागदपत्रे तिला परत न करता तिची फसवणूक केली आहे. त्यामुळे तेजस आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.