पुणे : ‘‘पाश्चिमात्य इतिहासकारांनी भारतीय योध्दयांचे तोंड भरुन कौतुक केले असे फार कमी वेळा दिसून येते. बाजीराव पेशवा याला काही प्रमाणात अपवाद म्हणावा लागेल. इतिहासात आपण अनेकदा अडकून पडतो. त्या इतिहासाचे संशोधनात्मक दृष्ट्या अनुकरण करण्यात आपण कमी पडतो. वेगवेगळे योध्दे का यशस्वी झाले? त्यांच्या विजयामागील कारणे काय? याचा अभ्यासूपणाने विचार करावा लागेल. इतिहासातून आपण काय शिकतो. हे जास्त महत्वाचे आहे,’’ असे मत भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. मेजर जनरल शशिकांत पित्रे लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित बाजीराव पेशव्यावरील ‘या सम हा’ या पुस्तकाचे प्रकाशन नरवणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. सिम्बबायोसिसच्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवृत्त वायुसेना प्रमुख एअरचीफ मार्शल प्रदीप नाईक, लेफ्टनंट जनरल जयंत पाटणकर व डॉ. श्रीकांत परांजपे व राजहंस प्रकाशनचे आनंद हर्डीकर उपस्थित होते. नरवणे म्हणाले, ‘‘आपल्याला प्रेरणादायी इतिहास आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करुन त्यापासून भविष्यात सर्जनशील कृती करण्याची गरज आहे. केवळ स्मरणरंजनात न जाता आपल्या हातून भरीव कामगिरी कशी होईल याकडे लक्ष द्यावे लागेल. इतिहासात अनेक योध्दे यशस्वी का झाले त्यांना आलेल्या अपयशाच्या त्यांच्या यशात कितपत वाटा आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. त्यातून आपल्या रोजच्या जगण्याच्या लढाईला बळ मिळणार आहे. आपल्याकडे मौखिक इतिहासामुळे अनेक मौलिक गोष्टी नाहीशा झाल्या. त्याचे लेखन पुन्हा न झाल्याने तो इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे प्रत्यक्ष रणांगणावर काय झाले? तेथील परिस्थिती याचे प्रत्ययकारी वर्णन सापडणे कठीण जाते.’’ यावेळी नरवणे यांनी बाजीरावाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु उलगडले. नाईक म्हणाले, बाजीरावाचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. केवळ ताकदच नव्हे तर त्याने अचाट बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक राज्ये जिंकुन घेतले. बाजीरावाची युध्दनीती हा देखील स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्याचे युध्दकौशल्य अतुलनीय होते. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 39 लढाया केल्या. त्या सर्व जिंकल्या यावरुन त्याची महानता स्पष्ट होते.
इतिहासातून आपण काय शिकतो हे महत्वाचे : लष्करप्रमुख मनोज नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 7:02 PM
इतिहासात आपण अनेकदा अडकून पडतो. त्या इतिहासाचे संशोधनात्मक दृष्ट्या अनुकरण करण्यात आपण कमी पडतो.
ठळक मुद्देनिवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे लिखित ‘या सम हा’ पुस्तकाचे प्रकाशन