शेलपिंपळगाव (पुणे) : मरकळ (ता.खेड) येथील जयसिंग रामभाऊ लोखंडे यांच्या गादी कारखान्याला शुक्रवारी (दि.३) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमध्ये उत्पादनाचे साहित्य, वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान घटनास्थळी आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पुणे पीएमआरडीच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. विजेचे शॉट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मरकळ येथील गादी कारखान्यास सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे कार्य सुरू केले. परंतु लागलेली आग मोठ्या प्रमाणावर असल्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पुणे पीएमआरडीच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. साधारण अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. दरम्यान आग विझवण्याचे कार्य सुरू असताना कारखान्यात असलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याने स्फोट होण्यापासून अटकाव झाला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
आगीत गादी कारखान्याशेजारी उभ्या असलेल्या दोन ट्रक, एक पीकअप वाहन पूर्णपणे जळाले असून कारखान्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विजेचे शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.