जेजुरी : श्री संत शिरोमणी माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामी येत असल्याने राज्यभरातून आलेल्या माऊली भक्तांनी आज जेजुरी गडावर आले आहेत. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबऱ्याची उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले.
वारी हो वारी । देई कांगा मल्हारी ।त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ।
या संत एकनाथांच्या ओव्या गात माऊली भक्तांनी जेजुरी गडावर मोठी गर्दी होती. जेजुरी गड पिवळ्याधमक भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. दोन वर्षांनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरीला जात असल्याने सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. नेहमीपेक्षा सोहळ्यात वैष्णवांची मोठी गर्दी असल्याने जेजुरीतील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मार्तंड देव संस्थान कडून गडावर माऊली भक्तांना पिण्याचे पाणी, महाप्रसादाची सोय केली होती. देवसंस्थान कडून पालखी सोहळ्यातील माऊलीभक्तांसाठी बुंदी वाटपापबरोबरच हरिपाठ ही वाटप करण्यात येत होते.