नामाशी विन्मुख तो नर पापिया।हरीविण धावया न पावे कोणी।।पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक।नामे तिन्ही लोक उद्धरती।।वाल्हे : खंडेरायाच्या जेजुरीनगरीतून माऊलीचा पालखी सोहळा दौंडज खिंड येथे गुरुवारी सकाळची न्याहारी घेऊन आद्यकवी ‘रामायण’कार श्री महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये सकाळी १२.२० ला पोहोचला. या वेळी मोठ्या संख्येने जमा झालेल्या वाल्हेकर ग्रामस्थांनी जोरजोरात ‘माऊली-माऊली’च्या घोषणा देत व टाळ्यांचा तालावर माऊलींच्या अश्वांचे व पालखी रथाचे जोरदार स्वागत केले. दुपारी वरुणराजाच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण वातावरण माऊलीमय झाले होते. यावेळी वाल्हे गावाचे प्रथम नागरिक अमोल खवले, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, उपसरपंच वैशाली पवार, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, पोलीस पाटील प्रवीण कुमठे, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, दत्ता अण्णा पवार, गिरीश नाना पवार, रामदास भुजबळ, रामदास राऊत, पोपटनाना पवार आदी ग्रामस्थांच्या उपस्थित सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी सुकलवाडी रेल्वेगेट फाटा या ठिकाणी २.२५ वाजता पोहोचला. मानाच्या दिंड्या आल्यानंतर या ठिकाणी वाल्हे गावातील ज्या मदने कुटुंबाने पालखी तळाला जागा दिली. या लोकांनी पालखी खांद्यावर घेऊन समाज आरतीसाठी शितोळे सरकारांच्या तंबूसमोर पालखी आणण्यात आली. या वेळी टाळमृदंगाच्या तालावर नाद धरत जोरात माऊलीचा गजर सुरू होता. या वेळी चोपदाराने जोरात आरोळी देताच सर्व वातावरण शांत झाले. चोपदारांनी वारकरी व प्रशासनाला काही सूचना केल्या व हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची माहिती दिली. या वेळी वरुणराजाच्या उपस्थितीत समाज आरतीला सुरुवात करण्यात आली. या वेळी बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, अजित कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर अण्णासाहेब जाधव तसेच सर्व विभागांचे तालुका अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वाल्हेकर मंडळींनी मंडळाच्या वतीने बऱ्याच ठिकाणी मोफत चहा, नाष्टा, पाण्याचे वाटप वारकऱ्यांना केले. शुक्रवारी सकाळी सोहळा ६ वाजता नीरेकडे प्रस्थान करणार असून दुपारी पवित्र नीरास्नान होईल. त्यानंतर सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे...............
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।।लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ।।मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ।।सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा ।।अशा लोकप्रिय ओव्या गातच गुरुवारी पहाटेच तीर्थक्षेत्र खंडोबाच्या जेजुरीचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने वाल्ह्याकडे प्रस्थान ठेवले. सकाळी ९ वाजता दौंडज खिंडीतील न्याहारी आटोपून सोहळ्याने दौंडज गावाकडे विश्रांतीसाठी कूच केले.कुलदैवत श्री खंडेरायाच्या दर्शनाने कृतकृत्य झालेल्या वारकºयांनी जेजुरीनगरीचा निरोप घेऊन आद्यकवी ‘रामायण’कार महर्षी वाल्मीक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीकडे सकाळी साडेसहा वाजता प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी, ६ वाजता पालखी सोहळ्याच्या मानकºयांसह जेजुरीकरांनी माऊलींची नित्य महापूजा उरकली. या वेळी पालिकेचे पदाधिकारी ही उपस्थित होते. जेजुरीकरांनी दौंडज खिंडीपर्यंत जात निरोप दिला. सकाळी ८ वाजता खिंडीच्या चहू बाजूंच्या हिरवाळलेल्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी सोहळा न्याहारीसाठी विसावला. दौडज खिंडीत कोळविहीरे आणि दौडज परिसरातील शेतकरी भाविकांनी दिलेली न्याहारी वैष्णव घेत होते. कोळविहीरे येथील भोरवाडीच्या ग्रामस्थांनी आपापल्या घरातून भाजीभाकरी आणून तिचे माऊली भक्तांना वाटप केले. काही सामाजिक संस्थांनीही अन्नदानाची सुविधा केली होती.न्याहारी उरकून ९ वाजता सोहळ्याने वाल्ह्याकडे कूच केले. ११च्या सुमारास सोहळा दौंडज येथे विसाव्यासाठी पोहोचला. अर्ध्या तासाच्या विसाव्यात परिसरातील कवडेवाडी, पिंगोरी दौंडजच्या वाड्यावस्त्यांवरील आबालवृद्धांनी माऊलींचे दर्शन घेतले. दुपारचा नैवेद्य आणि भोजनासाठी सोहळा वाल्ह्याकडे मार्गस्थ झाला.