जेजुरी :पंढरीत आहे रखुमाई, येथे म्हाळसा-बाणाई ।तेथे विटेवरी उभा, इथे घोड्यावरी शोभा ।।तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान ।तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे ।।तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा ।तेथे मृदंग-वीणा-टाळ, येथे वाघ्या-मुरळीचा घोळ ।। अशा लोकप्रिय ओव्यांच्या सुरात दिंडीकरी वैष्णवजन बुधवारी सायंकाळी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबानगरीत पोहोचले. जेजुरीकरांनी व नगरपालिका, मार्तंड देव संस्थान यांच्या वतीने भंडाऱ्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाळमृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडारा, खोबऱ्याच्या उधळण करत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दर्शन घेतले. बुधवारी (दि. ११ जुलै) सकाळी श्री संत सोपानकाकांच्या सासवडनगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आभाळ, अधूनमधून होणारा ऊनसावलीचा खेळ, दिंडी-दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गवळणी, आंधळे, पांगळे, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झपझप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवके मळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती त्याचबरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी ५ वाजता मजल-दरमजल करत सोहळा जेजुरीत पोहोचला.जेजुरीत पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक अजिंक्य देशमुख, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, योगेश जगताप, रुक्मिणी जगताप, पौर्णिमा राऊत, वृषाली कुंभार, शीतल बयास आदींनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी सदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत करण्यात येत होते. मार्तंड देवसंस्थानाच्या वतीने ही प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे, अॅड. अशोक संकपाळ, अॅड. प्रसाद शिंदे, तुषार सहाणे यांनी भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे स्वागत केले. दररोज अबीर बुक्क्यात न्हाऊन निघणारा सोहळा जेजुरीत पिवळ्याजर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. जेजुरीनगरीच्या पूर्वेला माऊलींचा पालखी सोहळा औद्योगिक वसाहतीनजीक पालखी तळावर पोहोचला. शहरापासून दूर असल्यामुळे अनेक भाविकांनी माऊलींचे दर्शन याच ठिकाणी घेतले. सायंकाळी ६ वाजता माऊलींचा पालखी सोहळा समाज आरतीनंतर मल्हारनगरीत विसावला.आज दिवसभर माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी भाविक तीर्थक्षेत्र जेजुरीत येत होते. जेजुरीत प्रवेश केल्यानंतर वारकरी जेजुरीगडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन करून कुलदैवताची वारीही पूर्ण करत होते. जेजुरीगडावरही मोठी गर्दी होती.
भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे खंडोबानगरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:44 PM
वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडारा, खोबऱ्याच्या उधळण करत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दर्शन घेतले.
ठळक मुद्देसदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण