लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत आषाढी एकादशी निमित्ताने टाळ-मृदंगाच्या निनादात व ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या जयघोषात माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद असल्याने प्रथा परंपरेनुसार माऊलींची होणारी नगरप्रदक्षिणा ऐवजी मंदिर प्रदक्षिणा झाली. तर हजेरी मारुती मंदिरातील किर्तनाऐवजी मुक्ताबाई मंडपात कीर्तन सेवा पार पडली.
मंगळवारी (दि.२०) पहाटे आषाढी एकादशी निमित्त ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर चांदीचा मुखवटा ठेवून माऊलींना पोशाख करण्यात आला. दुपारी नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आषाढी एकादशी निमित्ताने घालण्यात येणाऱ्या प्रदक्षिणा कार्यक्रमास प्रारंभ झाला. विविध रंगबिरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत माऊलींचा मुखवटा विराजमान करताच मोजक्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या जयघोष केला.
मुक्ताबाई मंडपात श्रीहरी चक्रांकित महाराजांचे कीर्तन सेवा संपन्न झाली. मानकरी व संबंधित वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीतून माऊलींची टाळ - मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास माऊलींचा मुखवटा संजीवन समाधीवर स्थानापन्न केल्याची माहिती देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
चौकट :
नगरप्रदक्षिणा ऐवजी मंदिर प्रदक्षिणा...
दरवर्षी आषाढी एकादशीला परंपरेनुसार माऊलींची पालखीतून नगरप्रदक्षिणा होत असते. मात्र, मागील एक वर्षांपासून कोरोनाचे सावट पसरल्याने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंधने आली आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायीवारी रद्द करून बसद्वारे वारी पंढरीला गेली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला परंपरेनुसार आळंदीत होणारी माऊलींची पालखीतील भव्यदिव्य नगरप्रदक्षिणा रद्द करून निवडक वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली आहे.
चौकट : भाविकांनी घेतले महाद्वारातून दर्शन...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त आळंदीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाद्वारातून माऊलींच्या मुखवट्याचे दर्शन घेतले. देवस्थाने माऊलींचे दर्शन घेण्याची लाईव्ह सोय केली होती.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत आषाढी एकादशी निमित्ताने माऊलींची ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या जयघोषात पालखीतून मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली.(छाया : भानुदास पऱ्हाड) २) आषाढी एकादशी निमित्त मुक्ताबाई मंडपात कीर्तन सेवा पार पडली.
३) आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे माऊलींच्या चलपादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले.
४) पंढरपूर (वाखरी) येथे माऊलींची व इतर संतांच्या झालेल्या भेटी.