वाल्हे (जि. पुणे) : पुराणप्रसिद्ध बोलले वाल्मीक ! नाम तिन्ही लोक उद्धरती!महर्षी वाल्मिकीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भर दुपारी झालेल्या समाजआरतीवेळी माऊलींच्या विश्वरूप दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सोमवारी सकाळी जेजुरीहून निघाल्यानंतर दौंडज येथे विसावा घेऊन दुपारी दीडच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरीमध्ये पोहोचला. यावेळी समस्त वाल्हेकरांसह स्वागताला वरुणराजाने हजेरी लावली. वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले.दुपारीच झाली समाजआरती - प्रत्येक ठिकाणी पालखी सायंकाळी मुक्कामी पोहोचते. त्यानंतर समाजआरती होते. - परंतु, वाल्ह्यात दुपारीच पालखी मुक्कामाला पोहोचते. त्यामुळे भर दुपारी समाजआरतीचे दर्शन मोठ्या संख्येने भाविकांना होते. - समाज आरतीच्या वेळी मध्यभागी माऊलींची पालखी ठेवली गेली व त्याभोवताली गोलाकार हजारो भाविक बसले, तर ४७ दिंड्या उभ्या केल्या गेल्या. - पालखीसमोर चोपदार मालक, त्यापुढे वासकर, आळंदीकर, शितोळे सरकारांचे प्रतिनिधी उभे होते.
वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:32 PM