लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लावण्यासाठी नागपूर, कोल्हापूर पाठोपाठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही पेपर तपासणीच्या मदतीसाठी धावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे ३० व व्यवस्थापन विभागाचे ३० असे एकूण ६० प्राध्यापकांकडून मुंबई विद्यापीठाच्या पेपरची तपासणी करण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याची डेडलाइन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घालून दिली आहे. निकालाची ही डेडलाइन पाळणं मुंबई विद्यापीठासाठी अत्यंत अवघड बनले आहे. आॅनलाइन पद्धतीने पेपर तपासणी केली जात आहे. नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली यासह आता पुण्यामध्ये आॅनलाइन पद्धतीने पेपर तपासणी केली जात आहे.आणीबाणीच्या या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना ३१ जुलैपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर सुमारे ६ हजार शिक्षकांकडून ४ लाख पेपरची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मदतीला पुणेही धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:50 AM