शिरूर लोकसभा निवडणूक २०१९ : छत्रपती संभाजी महाराजांच्या ''या'' वाक्याने अमोल कोल्हे यांना प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 04:53 PM2019-05-23T16:53:12+5:302019-05-23T16:53:24+5:30
शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 60 हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका प्रेरणादायी वाक्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पुणे :शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 60 हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असून सध्या ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी तोल अजिबात ढळू न देता त्यांच्याकडून पराभूत होणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे .इतकेच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका प्रेरणादायी वाक्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्याडॉ अमोल कोल्हे यांनी विजयश्री खेचली असून त्यांनी तीन वेळा हॅट्रिक करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखला आहे.यावेळी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील मतमोजणी कार्यालयात त्यांनी हजेरी लावली.त्यावेळी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुजीव मुलाखतीत ते म्हणाले की, तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्य कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही या वाक्याने मला प्रेरणा दिली.कितीही बिकट परिस्थिती असेल तरी लढायचं आणि लढलं की विजय मिळतोच या महाराजांच्या वाक्याने मला लढण्याची ऊर्जा दिली.सुरुवातील अनेकांना निवडणूक एकतर्फी होईल असे वाटले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मला यश मिळाले.आता मतदारसंघातले सर्व प्रलंबित प्रकल्प पूर्ण करायचा मानस आहे.