लोणावळा, दि. 20 - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे.संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडत 3680 क्यसेक्सने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे.आज दुपारी एक वाजता धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडत त्याद्वारे 1472 क्युसेक्स व हायड्रो गेटद्वारे 1428 क्यसेक्स पाणी धरणातून सोडण्यात आले होते मात्र पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दुपारी 3.30 नंतर यामध्ये वाढ करत सहा दरवाज्यांवाटे 2208 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. लोणावळा व मावळ परिसरात मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना धरण हे शंभर टक्के भरले असून धरणात 8.512 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाची संततधार व जोर आजही कायम असल्याने धरणातून दरवाजे व हायड्रो गेटमधून 3680 क्युसेक्सने पाणी विसर्जित करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.पावसामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत असताना तीच्यामध्ये धरणातून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर येण्याची शक्यता ध्यानात घेत नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील पवना धरण 100 टक्के फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:09 PM