पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काही उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचे त्रांगडे कायम आहे. महायुतीतील पक्षांत रस्सीखेच आहे. मावळमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपनेही दावा केला आहे, तर शिरूरसाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खेचाखेची सुरू आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील पवार घराण्यामध्ये आता कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. परंतु फूट झाल्याने ताकद विभागली आहे.
महायुतीत उमेदवारीचे ठरेना
भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र आले, तेव्हा ज्या मतदारसंघात ज्यांचा खासदार आहे, त्यांना ती जागा देण्याचे सूत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले होते. त्यामुळे सुरुवातीला मावळमधून खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी मिळेल असे चित्र होते. मात्र, महायुतीत अजित पवार यांची ‘एंट्री’ झाली आणि शिवसेनेचा ताप वाढला. गेल्या दोन महिन्यांपासून मावळवर भाजप आणि अजित पवार गटांनी दावा केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मावळमधून संजोग वाघेरे आणि शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
आता अजित पवार गट आक्रमक
महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला, शिंदे गटाला की भाजपला मिळणार, याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. आढळराव पाटील शिवसेनेच्या, भाजपच्या की राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढणार, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे भाजपकडून आ. महेश लांडगे आणि अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनीही दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीने आयात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका पवार समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची गोची झाली आहे. मावळमधील अजित पवार गटाची मुंबईत बैठक झाली. त्यावेळी मावळ मतदारसंघ मिळावा, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी द्यावी, असे पत्र पदाधिकाऱ्यांनी दिले.
मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, अशी आमची मागणी आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पत्र दिले आहे.
- नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही जागा आमच्याकडेच असावी, आमच्यातीलच उमेदवार असावा. आयात उमेदवार देऊ नये, अशी आमची मागणी आहे.
-विलास लांडे, माजी आमदार, राष्ट्रवादी