लोणावळा : मावळ तालुका पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आज ७૪ टक्के मतदान झाले. मावळ तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावळा, माळेगाव बु., खांड, इंगळून, साते या पाच गावांमधील मतदान केंद्रावर उशिरा पर्यत मतदान सुरु होते. मावळ तालुक्यात १ लाख ७६ हजार ३७८ मतदारांपैकी १ लाख ३० हजार ५२२ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. यामध्ये ७० हजार ८३९ पुरुष व ५९ हजार ६८३ महिला मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी ७:३० वाजता मावळातील २१६ मतदान केंद्रावर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या दोन तासात ९:३० वाजेपर्यत मतदानांचा वेग संथ राहिल्याने ९.६५ टक्के मतदान झाले. तदनंतरच्या प्रत्येक दोन तासांच्या टप्प्यात सरासरी १५ टक्के मतदान झाल्याने दुपारी ३:३० पर्यत मावळात ५५.७८ टक्के मतदान झाले होते. किरकोळ वाद वगळत मावळात सर्वत्र शांततेमध्ये मतदान झाले. शिलाटणे गावात मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्याने ૪५ मिनिटे मतदान बंद होते, तेवढा वेळ नंतर वाढवून देण्यात आला. ग्रामीण भागात व ज्या गावातून उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा पहायला मिळत होत्या. संवेदनशिल केंद्रावर पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मावळात १६ पोलीस अधिकारी २९३ पोलीस कर्मचारी, ५૪ होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलीस ठाण्याचे अधिकारी हे मतदान केंद्रावर जातीने लक्ष ठेऊन असल्याने कसलाही गैरप्रकार झाला नाही.ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भाग व दुर्गम भागात मतदानाचा वेग काहीसा कमी होता. वडगाव मात्र याला अपवाद ठरले. कार्ला व शिलाटणे या दोन गावांमध्ये आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आले असून मतदान केंद्रावर मतदारांसाठी मंडप, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे तसेच आकर्षक रांगोळी काढत मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. मतदान करणार्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात असल्याने मतदारांनी देखिल आनंद व्यक्त केला. मावळच्या निवडणुक निरिक्षकांनी या केंद्रांना भेटी देत सोयीसुविधांची पाहणी केली.
मावळ तालुक्यात ७૪ टक्के मतदान
By admin | Published: February 21, 2017 9:51 PM