- विश्वास मोरे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ताकद असतानाही पराभवास सामोरे जावे लागले होते. तो पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला.
मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये २१ उमेदवार रिंगणामध्ये होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीतच खरी लढत झाली. अकरा उमेदवार अपक्ष होते. १३ लाख ६८ हजार ८७२ जणांनी अर्थात ६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी, चिंचवड, मावळ आणि पनवेलमधील मतदानाची टक्केवारी अधिक होती. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५०, वंचित बहुजन पक्षाचे राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ आणि बसपाचे संजय कानडे यांना १० हजार १९७ मते, तर नोटाला १५ हजार ७७९ मते मिळाली.
तरीही आले अपयश
श्रीरंग बारणे यांना मोदी नावाचा फायदा झाला. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, खासदार बारणे आणि भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील दहा वर्षाचा दुरावा कमी झाला. ही किमया घडविली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी हे मनोमिलन घडविले. त्याचाही काहीअंशी परिणाम बारणे यांच्या विजयावर जाणवला.
भाजपनेही घड्याळ चालविले
राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवड शहरातून फोडला होता. यावेळी शरद पवार यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. मात्र, त्यावेळी पार्थ पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणापासून मतदान होईपर्यंत अनेकवेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. बारामतीचा खासदार हवा की, पिंपरीतील, असाही प्रचार झाला. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्या पिंपरी आणि चिंचवडमधील नगरसेवकांनी युती धर्म न पाळता घड्याळ चालविले. पिंपरी, चिंचवड आणि मावळ, कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ताकद होती. मात्र, अजित पवार यांनी ज्यांना महापौर, आमदार, स्थायी समिती सभापती अशी पदे दिली, त्यांनीच घात केला. पवार जोर लावूनही पार्थ यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव पवार यांच्या जिव्हारी लागला.