श्रीकिशन काळे
पुणे: फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला. तसेच एक फुलपाखरू तिथे आठ महिन्यांपासून कोशातच आहे. कारण त्याला अजून बाहेरील वातावरण पोषक वाटत नाही. कदाचित या पावसाळ्यात ते बाहेर येऊ शकते. तेव्हा त्याला एक वर्ष पूर्ण झालेले असेल. अशा प्रकारची नोंद ही जगातील कदाचित पहिलीच असणार आहे.
गरवारे महाविद्यालयातील आबासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख व फुलपाखरू संशोधक डॉ. अंकूर पटवर्धन यांनी २०२० मध्ये फुलपाखरांचे गार्डन तयार केले. त्यानंतर प्रत्येक फुलपाखराचा अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. त्यांच्या नोंदीनुसार आजपर्यंत ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म या त्यांच्या गार्डनमध्ये झाला आहे.
फुलपाखरांनी अंडी दिल्यावर त्याच्यातून अळी बाहेर येते. अळी भरपूर खाऊन घेते आणि कोशात जाते. त्यानंतर दहा ते पंधरा दिवस कोशात राहिल्यावर त्यातून फुलपाखरू बाहेर पडते. परंतु, त्यांच्याकडे एक फुलपाखरू जुलै २०२१ मध्ये कोशात गेले होते, ते अजूनही कोशातच आहे. ते आतमध्ये जीवंत आहे. कारण तो कोश हिरवागार आहे. कारण आतील फुलपाखरू मृत झालं तर कोश काळा पडतो. बाहेरील वातावरण पोषक नसेल तर कोशातून फुलपाखरू बाहेर येत नाही. हे फुलपाखरू मात्र आतमध्ये एवढे दिवस का राहीले, त्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. कारण गेल्या महिन्यांमध्ये तापमानात अचानक बदल होणं, अवेळी व खूप पाऊस येणं अशा घडामोडी झालेल्या आहेत. यातील त्यावर नेमका कशाचा परिणाम झाला ते तपासणं गरजेचे आहे.
२०२० मधील पावसाळ्यात फुलपाखरू गार्डनमधील नोंदी घ्यायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू झाला. त्यात १६ प्रकारच्या प्रजाती पहायला मिळाल्या.
फुलपाखरू गार्डनमध्ये १३ प्रजातीची फुलपाखरे...
२०२० पासून गार्डनमध्ये फुलपाखरांचा अभ्यास सुरू केला. तेव्हापासून १३ प्रजातीची ६०० हून अधिक फुलपाखरू पाहिली. जन्म अन् मृत्यू पाहणं एक अविस्मरणीय अनुभव आहे. सर्वाधिक ब्लू टायगर (१२०), काॅमन मोरमाॅन (१२०), प्लेन टायगर (१२०), काॅमन लाइम (७५), व्हाइट आॅरेंज पिफ, पायोनियर, टेल्ड जे आदी फुलपाखरं पाहिली.
एक फुलपाखरू फुलावर बसल्यानंतर त्याच्या पंखांवर सुमारे ७००-८०० परागकण चिकटल्याचे निरीक्षण करता आलं. एवढ्या प्रमाणावर परागीभवन इतर कोणीच करत नसावं. पावसाळ्यात सर्वाधिक फुलपाखरांचे ब्रिडिंग पाहिलं, तर उन्हाळा, हिवाळ्यात कमी होतं.