अविनाश हुंबरे-
सांगवी : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यातही सर्वसामान्य कुटुंबे हतबल झाली. पदरी मिळेल ते कामं करणाऱ्या महिला देखील याला अपवाद ठरल्या नाहीत. मात्र, ''जुनं ते सोनं' ही म्हण प्रत्यक्षात उतरवून अक्षर मानवने बेरोजगार महिलांची सांगड घालत त्यांच्या हाताला गोधडी शिवण्याचे काम दिले. सुरेख शिलाई, रंगसंगती, अप्रतिम, उबदार, व लांबून गालिचाच भासणारी गोधडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ग्रामीण लोकजीवनाचे लक्षण असलेल्या या गोधडीला भारतीय शहरात तर पसंती मिळतच आहे. पण आता बारामतीतील गोधड्यांना महाराष्ट्रासह स्पेन, इंग्लंड वरून गोधड्यांची मागणी येऊ लागली आहे .
बारामतीत अक्षरमानव संघटनेचे काम करणाऱ्या झरिना खान यांच्याकडे चिंतांनी ग्रासलेल्या काही महिला आल्या. काही काम असेल तर द्या म्हणून विनंती करू लागल्या. खान यांनी त्यांची विचारपूस करत त्यांना काय येतं, त्या काय करू शकतात याचा अंदाज घेतला. त्यावरून या महिलांना गोधडी शिवायला जमेल असं त्यांना लक्षात आलं. गरजू महिलांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी बेरोजगार महिलांना सोबत घेत 'अक्षरमानव गोधडी उपक्रम' मुहूर्तमेढ रोवली.
'सावली अनाथ आश्रमा'च्या 'माँ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरिना खान या गेल्या आठ महिन्यांपासून बेरोजगार महिलांना सोबत घेऊन महाराष्ट्राची गोधडी ही संस्कृती जोपासत आहे. या महिलांना खान यांनी आणखी मॉडर्न गोधडया शिवण्यासाठी धडे दिले. कच्च्या मालापासून गोधडी शिवून चांगल्यारितीने या सर्व महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या. त्यानंतर अक्षर मानव संघटनेचे अध्यक्ष व साहित्यिक राजन खान यांनी बारामतीच्या महिलांच्या कामाची दखल घेत त्यांच्या गोधड्या विक्रीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले.
सामाजिक कार्यकर्त्या झरिना खान या महिलांना घरपोच साहित्य पोहचवतात. त्यांना गरज असेल तेव्हा संघटनेच्या माध्यमातून फंड जमा करून देतात. गोधड्या शिवून झाल्या की, त्या गोळा करतात. आणी त्याची विक्री होते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे महिला कुटुंबाला मोठा आर्थिक आर्थिक हातभार लावत आहे. अशाप्रकारे अक्षरमानव एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे.
..........
आज शहरातल्या महिलांना किमान बाहेर पडून काम करण्याची मुभा आहे. रोजगार नसल्यामुळे, घर चालवायचं कसं हा प्रश्न त्यांना पडला आहे.म्हणून गोधडीच्या रूपाने मदतीचा हात द्यायला आम्ही उतरलो आहोत, त्यातून त्यांची आर्थिक बाजू सक्षम होईल.
- झरिना खान, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता, बारामती.