पुणे : ‘देवेंद्रजींनी देशसेवेचे, महाराष्ट्र सेवेचे व जनसेवेचे व्रत हाती घेतले असून, हे सेवाकार्य त्यांच्या हातून सदोदित होत राहावे, असे साकडे बाप्पांकडे घातले आहे. तसेच गणपती बाप्पांनी महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद द्यावा, असा आशीर्वाद मागितला आहे,’ अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, बँकर व गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
उद्योजिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत अमृता फडणवीस यांनी गणपतीची महाआरती केली. यावेळी मनोहारी ढोलवादनाने फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. फडणवीस यांनी ढोलवादनाचा आनंद घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे चांगले काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ‘ओम गण गणपतये नम:’ या श्लोकाचे गायन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.’
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देवेंद्र ज्या पदावर असतील, तिथे छाप पडतात. त्यामुळे अमुक पदासाठी माझा आग्रह नसतो. सध्या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने ‘त्रिदेव’ आहेत. शिंदे व पवार समर्पित भावनेने काम करतात. कामाच्या बाबतीत हे दोघेही देवेंद्र यांचे भाऊच आहेत. आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार राज्यामध्ये येईल. चंद्रशेखर बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. संघटनेसाठी राजकीय नेते सातत्याने काम करत असतात.’
‘नागपूरला एवढ्या मोठ्या पावसाची सवय नव्हती. नागपूर पूरपरिस्थिती आकस्मिक आलेले संकट आहे. यासाठी राज्य सरकार व प्रशासन सावध नव्हते. मात्र, दुर्घटना उद्भवल्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे तळ ठोकून आहेत. प्रशासन आपत्ती निवारणाचे काम वेगाने करत आहे. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी काटेकोरपणे नियोजन करायला हवे. नद्या, तलाव का तुंबत आहे, याचा विचार केला पाहिजे,’ असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या गणेशोत्सवात येऊन जाण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.
उषा काकडे म्हणाल्या, ‘गेल्या तीस वर्षांपासून माझ्याकडे गौरी-गणपती असतात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी याची शोभा वाढवतात; पण आज या डोळस व सुंदर भगिनींनी आपल्या कलाकारीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. या मुलींना दृष्टी नसली, तर त्यांच्यात अंगभूत कला व गुण काठोकाठ भरले आहेत. त्याचे मनोहारी दर्शन त्यांनी घडवले आहे. त्यांच्या रूपाने साक्षात माझ्या घरी खरोखर गौरींचा सहवास लाभल्याची भावना माझ्या मनात आहे.’