केडगाव येथील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण आत्महत्याग्रस्त विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांची बहीण पूजा लोणकर हिला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
लोणकर कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री निवासस्थानी भेट घेतली. या वेळी शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, उपनेत्या नीलम गोरे, जिल्हाप्रमुख महेश पासलकर, स्वप्निलचे वडील सुनील लोणकर, आई अंजना लोणकर, बहीण पूजा लोणकर उपस्थित होते. सुमारे दहा मिनिटांच्या चर्चेमध्ये लोणकर कुटुंबीयांनी प्रकरण कसे घडले या संदर्भात ठाकरेे यांना माहिती दिली. त्यानंतर कोरोनामुळेेे व तत्कालीन परिस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अडचणी ठाकरे यांनी लोणकर कुटुंबीयांना सांगितल्या. भविष्यामध्ये लवकरच भरती केली जाईल असेही आश्वासन दिले. शिवसेनेच्या वतीने लोणकर कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दौंड येथील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेे यांना निवेदन दिले. एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष मंत्रालयात स्थापन करावा, अशी मागणी केेेली. या वेळी कल्याणी वाघमोडे, विजयसिंह चव्हाण, युवा सेनेचे नीलेश मेमाणे,समीर भोईटे उपस्थित होते.
मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत मयत स्वप्निल लोणकरचे कुटुंबीय.