पुणे : शहराच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शनिवारी, दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर कोण होणार हे आज (शनिवार) निश्चित होणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी दिवसभर वरिष्ठ पक्षनेत्यांच्या भेटीगाठी, फोनाफोनी करीत जोरदार फिल्डिंग लावली.महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्याने येत्या २५ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी शनिवारी दु. ३ ते ५ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पीएमपीएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी नियुक्ती केली आहे.महापौर-उपमहापौरपदाची मुदत अडीच वर्षांची आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर महापौर पद हे सव्वा-सव्वा वर्षासाठी दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार वैशाली बनकर, चंचला कोद्रे यांना पहिल्या अडीच वर्षांत संधी देण्यात आली. त्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनीही राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे.
महापौर, उपमहापौर निवडीसाठी आज अर्ज
By admin | Published: February 20, 2016 1:12 AM