पुणे : शहरातील नगर रस्ता परिसराचा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी भामाआसखेड धरणापासून पुणे शहरापर्यंत टाकण्यात येत असलेल्या पाइपलाइनच्या कामात निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी महापौर प्रशांत जगताप बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे जाऊन भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या विरोधामुळे या प्रकल्पाचे थांबलेले काम या भेटीनंतर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.भामाआसखेड प्रकल्पाच्या पाइपलाइनच्या कामास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्याचे काम थांबले आहे. या कामात निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अनेकदा बैठका घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही यातून मार्ग निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय भामाआसखेड प्रकल्पाचे सुरू होऊ देणार नाही अशी भुमिका शिवसेनेच्यावतीने घेण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम रखडत चालल्याने त्याचा खर्च वाढत चालला आहे. (प्रतिनिधी)
भामा-आसखेड प्रकल्पासाठी महापौर आज सेना भवनावर
By admin | Published: March 30, 2016 2:06 AM